भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:57 IST2025-12-30T10:54:49+5:302025-12-30T10:57:31+5:30
CM Devendra Fadnavis Reaction on BMC Election 2026: भाजपाचे अमित साटम आणि शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांनी संयुक्तपणे मुंबई मनपा निवडणुकीसाठी जागावाटपाची घोषणा केली.

भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
CM Devendra Fadnavis Reaction on BMC Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अखेर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. सोमवारी रात्री उशिरा याबाबत अंतिम निर्णय झाला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे भाजपा-शिंदे गटाचे जागावाटप ठरल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
भाजपा १३७ जागा आणि शिवसेना शिंदे गट ९० जागांवर निवडणूक लढणार आहे. महायुतीचे घटक पक्ष याच आकड्यात समाविष्ट केले जाणार आहेत. लवकरच एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल. मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने मुंबईचा महापौर महापालिकेत विराजमान झाला पाहिजे. मुंबई शहराचा विकास होत असताना, मुंबईची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहिजे. मामूंची टोळी मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते, त्यांना घरी पाठवण्याचे काम महायुती करणार आहे, असा विश्वास भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला.
मुंबईकर प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील
भाजपा आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून १३७ जागा भाजपा तर ९० जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे. सर्व उमेदवारांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा!, अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर करत प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे प्रभारी सरचिटणीस व माजी खा. राहुल शेवाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा केली. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अधिकृत यादी जाहीर न करता उमेदवारांना वैयक्तिकरीत्या संपर्क साधून अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्याचा निर्णय महायुतीतील दोन्ही पक्षांनी घेतला आहे.