पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:52 IST2026-01-01T13:49:22+5:302026-01-01T13:52:04+5:30
BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
BMC Election 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु, युती-आघाडीच्या निर्णयात झालेला उशीर, जागावाटपांचे अडलेले घोडे आणि हातातून निसटून चाललेली वेळ यामुळे संपूर्ण राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. याला आता राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही विरोधी उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखले, त्यांना धमकावले व निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनाही सदर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यास सांगितले, असे आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर केले जात आहेत. संबंधित उमेदवारांनी सोशल मीडियावर यासंदर्भात आरोप करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यामुळे आता राहुल नार्वेकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप केले जात आहेत
पत्रकारांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी या आरोपांना उत्तर दिले. संजय राऊत व उद्धव ठाकरे गटाकडून अशीच अपेक्षा होती. जेव्हा पराभव दिसतो, तेव्हा असे बिनबुडाचे आरोप करून पराजयाचे कारण शोधण्याचा प्रयत्न चालू असतो. त्यातलाच हा प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा व त्यांच्या पक्षाचा पराभव दिसत असल्यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा पलटवार राहुल नार्वेकर यांनी केला.
दरम्यान, निवडणूक कार्यालयात सायंकाळी ५ वाजता जेवढे उमेदवार उपस्थित होते, त्यांना आत घेतले गेले. जे वेळेत आले नाहीत, त्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यात भाजपाच्याही काही उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. २१२ प्रभागातल्या आमच्या उमेदवारालाही अर्ज भरता आला नाहीत. ज्यांना रडीचा डाव खेळायचा आहे, ते अशी कारणे देत असतात. ज्यांच्याकडे शेवटपर्यंत उमेदवार नव्हते, ज्यांनी १-२ वाजता उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत, ते सायंकाळी ५ पर्यंत कसे अर्ज भरू शकतात? चूक तुमची आहे. तुम्ही वेळेत त्यांना उमेदवारी दिली असती, तर कदाचित त्यांना उमेदवारी अर्ज भरता आले असते, असे राहुल नार्वेकर म्हणाले.