“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:59 IST2026-01-05T05:59:15+5:302026-01-05T05:59:15+5:30
उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करताना साटम यांच्या नावाबाबत अपशब्द वापरला होता.

“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
लोकमत न्युज नेटवर्क, मुंबई : मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे यांचा झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल, असा प्रत्यारोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ठाकरे यांनीच महापालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी वचननामा प्रसिद्ध करताना साटम यांच्या नावाबाबत अपशब्द वापरला होता. त्यावर साटम म्हणाले, हा माझा नाही, तर मराठी माणसाचा, कोकणी, मालवणी माणसाचा उद्धव ठाकरे यांनी अपमान केला आहे. २५ वर्षांच्या काळात महापालिकेत स्थायी समिती आणि बदल्यांच्या माध्यमातून ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.
कोस्टल रोडचे श्रेय फडणवीस यांचेच
कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. कोस्टल रोडला सर्व परवानगी फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून आणल्या, असे ते म्हणाले.