वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:07 IST2025-12-31T14:06:08+5:302025-12-31T14:07:12+5:30

BMC Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

bmc election 2026 big setback to congress due to vanchit bahujan aghadi to not filled candidature on many places in mumbai | वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!

वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!

BMC Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तिकीट नाकारल्याने भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यातच मुंबई मनपात काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला होता; परंतु, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेस पक्षाने आघाडी केल्याचे जाहीर केले. परंतु, अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीत मुंबईत २२७ जागांपैकी वंचित ६२ जागा लढण्याचे ठरले होते. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला १० च्या आसपास जागा सोडून काँग्रेस १५० च्या आसपास जागा लढवणार होते. परंतु, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी जाहीर होताना मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या आघाडीसाठी हर्षवर्धन सपकाळ आणि सचिन सावंत यांनी पुढाकार घेतला. यानंतर मात्र वंचित बहुजन आघाडीने अनेक जागांवर उमेदवारी अर्जच दाखल केले नसल्याचे म्हटले जात आहे. 

‘वंचित’मुळे काँग्रेसला मोठा धक्का!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितने त्यांच्या वाट्याला आलेल्या ६२ पैकी फक्त ४६ जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. १६ जागांवर वंचितने उमेदवार न मिळाल्यामुळे अर्ज भरले नाहीत. काँग्रेस पक्षाने मोठ्या विश्वासाने वंचित बहुनज आघाडीला जागा देऊ केल्या होत्या. मुंबईत वंचित बहुजन आघाडीची फारशी ताकद नसल्याने १६ जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसलाही या जागांवर आपल्या इच्छूक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवता आले नाही. विशेष म्हणजे या १६ जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर रात्री उशिरा आणखी ५२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. परंतु उर्वरित २६ उमेदवारांची यादी अजून प्रसिद्ध केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे हे गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडे या जागांवर उमेदवार नाही का, अशा चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मी मुंबईबाहेर आहे. त्यामुळे याविषयी मला फारशी कल्पना नाही, असे ते म्हणाले.

 

Web Title : गठबंधन संकट: वीबीए के उम्मीदवार खड़े करने में विफल रहने पर कांग्रेस को झटका

Web Summary : मुंबई बीएमसी चुनाव में वीबीए के साथ कांग्रेस का गठबंधन लड़खड़ाया। गठबंधन के बावजूद वीबीए 16 सीटों पर उम्मीदवार नहीं उतार सकी। आंतरिक कलह और उम्मीदवारों की अनुपलब्धता से कांग्रेस परेशान, सीटें खाली। शेष उम्मीदवारों पर अनिश्चितता।

Web Title : Alliance Woes: Congress Faces Setback as VBA Fails to Field Candidates

Web Summary : Congress's alliance with VBA falters in Mumbai's BMC election. VBA couldn't field candidates on 16 seats despite the alliance. Internal strife and candidate unavailability plague Congress, leaving seats unfilled. Uncertainty looms over remaining candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.