"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:30 IST2025-12-30T16:13:38+5:302025-12-30T16:30:44+5:30
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घरात तिघांना मिळालेल्या उमेदवारीवरुन स्पष्टीकरण दिले आहे.

"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट देण्यात येणार नसल्याचे भाजपने जाहीर केले. मात्र दक्षिण मुंबईत भाजपचे आमदार नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबावर विश्वास दाखवत भाजपने त्यांच्या घरातील तीन सदस्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. घरातच तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर चर्चा सुरु झाल्याने राहुल नार्वेकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि कुलाबा भागातील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना प्रभाग क्रमांक २२६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मकरंद नार्वेकर यांच्या पत्नी हर्षिता यांना भाजपने प्रभाग क्रमांक २२७ मधून रिंगणात उतरवले आहे. यासोबत राहुल नार्वेकर यांच्या चुलत भगिनी गौरवी यांना प्रभाग क्रमांक २२५ मधून तिकीट मिळाले आहे. स्वतः राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने एक महत्त्वाचा पवित्रा घेतला होता. आमदार, खासदारांच्या मुलांना किंवा पत्नीला उमेदवारी दिली जाणार नाही, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देऊन घराणेशाही मोडीत काढण्याचा दावा भाजपने केला होता. मात्र, नार्वेकर कुटुंबाच्या बाबतीत वेगळा न्याय दिला गेल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु झाली.
या सर्व वादावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी कुटुंबातील सदस्यांचे समर्थन केले आहे. "ज्यांना उमेदवारी मिळालीय ते उमेदवार पॅराशूटने आणलेले नाहीत. त्यांनी गेली १०-१५ वर्षे लोकांमध्ये राहून त्यांची कामे केली आहेत. लोकांनी त्यांना स्विकारले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आहे," असं राहुल नार्वेकर म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीतच तिन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.