'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:50 IST2026-01-01T10:28:44+5:302026-01-01T10:50:56+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2025: ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्रात होणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती
मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा हाती घेत एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धवसेना या पक्षांची मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठीची जागावाटपाची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीतपणे पार पडली आहे. जागावाटप करून करून उमेदवार निश्चित केल्यानंतर आता ठाकरे बंधूंकडून मुंबईकरांना दिला जाणारा वचननामा आणि सभांच्या नियोजनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्रात होणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या वचननाम्यावर शेवटचा हात फिरवण्याचं काम दोन्ही बाजूंनी सुरू आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्तसभा मुंबईसह एमएमआर परिसरात होतील. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये संयुक्त सभा होतील. त्यानंतर शिवतीर्थावर संयुक्त सभा होईल. त्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये सभा होईल, ठाण्यामध्ये सभा होईल, कल्याण आणि डोंबिवली अशा दोन सभा होतील. तसेच नाशिक येथेही संयुक्त सभा होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.उद्धव सेना आणि मनसेचा वचननामा हा एकत्रित असणार आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे या वचननाम्यावर काम करत आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरसुद्धा जोरदार टीका केली. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय कार्यक्रमांत सहभागी होऊ नयेत, असे संकेत आहेत. मात्र राहुल नार्वेकर हे गळ्यात भाजपाचं उपरणं घालून आपल्या कुटुंबातील उमेदवारांचे अर्ज भरायला गेले, होते असं माझ्या निदर्शनास आलं. तसेच महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमक्या देत आहे, प्रशासनावर दबाव आणत आहे असेही दिसून आले आहे, या राज्यात काय चाललंय हे विचारायची सोय उरलेली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.