राखीव जलसाठ्यावर पालिकेची मदार; पाणीसंकट आल्यास भातसा, अप्पर वैतरणातून पाणी घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 05:57 IST2025-03-23T05:56:55+5:302025-03-23T05:57:31+5:30
मुंबईला सात तलाव आणि धरणांतून पाणीपुरवठा होतो

राखीव जलसाठ्यावर पालिकेची मदार; पाणीसंकट आल्यास भातसा, अप्पर वैतरणातून पाणी घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतीलपाणीसाठा झपाट्याने आटत चालला आहे. आणखी अडीच महिने उन्हाळ्याचे बाकी आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीसंकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा या दोन धरणांतील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे. तशा आशयाचे पत्र पालिका प्रशासनाने पाठविले आहे.
मुंबईला सात तलाव आणि धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने जलसाठा खालावत आहे. तूर्तास पाणीसाठा ३९ टक्के आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ३४ टक्के होते. परंतु यंदाचा उन्हाळा अधिक कडक असेल, असा अंदाज असल्याने हा जलसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या वरील दोन धरणांतील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी केली आहे. एकूण परिस्थिती लक्षत घेता पाणी खात्याने दोन धरणांतून राखीव साठा उचलण्यास परवानगी मागितली आहे, अशी माहिती पाणी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कधी वापरतात राखीव साठा?
- अप्पर वैतरणातून ६८ हजार दशलक्ष लिटर, तर भातसातून १ लाख १३ हजार लिटर पाणी घेण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात करण्यात आली आहे.
- आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच पाणी साठ्याचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
- या बैठकीत धरणात किती पाणी साठा आहे, तो कधीपर्यंत पुरू शकेल याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर राखीव साठ्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली.
- धरणात विशिष्ट पातळीपर्यंत पाण्याचा साठा राखीव असतो. त्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उदभवली तरच राखीव साठ्याला हात घातला जातो.