बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:43 IST2025-05-09T17:42:15+5:302025-05-09T17:43:54+5:30
मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. मुंबई मेट्रो-३ चा अर्थात शहराच्या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे.

बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. मुंबई मेट्रो-३ चा अर्थात शहराच्या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशा दुसऱ्या टप्प्याचं उदघाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या मेट्रो सेवेमुळे आता बीकेसी ते वरळी हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत गाठता येणार आहे.
मेट्रो-३ चा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचंही काम वेगानं सुरू होतं. अखेर आज बीकेसी ते वरळी नाका असा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ६ स्थानकं असून हे अंतर ९.८ किलोमीटर इतकं आहे. यातील सर्व स्थानकं ही भूमिगत आहेत. दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे आता आरे कॉलनी ते वरळी असा थेट प्रवास करणं शक्य झालं आहे. आरे कॉलनी ते वरळी नाका याप्रवासासाठी ६० रुपये मोजावे लागणार आहेत.
बीकेसी ते वरळी नाका स्थानकं कोणती?
१. बीकेसी
२. धारावी
३. शितलादेवी मंदिर
४. दादर
५. सिद्धिविनायक मंदिर
६. वरळी
७. आचार्य अत्रे चौक (वरळी नाका)
बीकेसी ते वरळी तिकीट किती?
बीकेसी ते वरळी नाका या सहा स्थानकांसाठी मेट्रो प्रवासाचं किमान भाडं हे १० रुपये तर कमाल भाडं ४० रुपये इतकं असणार आहे. तर आरे कॉलनी ते वरळी नाका या प्रवासासाठी ६० रुपये मोजावे लागतील.
वरळी ते कफ परेड लवकरच...
बीकेसी ते वरळी नाका हा दुसरा टप्पा आज सेवेत दाखल झाल्यानंतर आता वरळी ते कफ परेड असा तिसरा टप्पा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्याचा मेट्रो प्रशासनाचा मानस आहे. हा शेवटचा टप्पा असणार आहे आणि प्रकल्पाचं एकूण काम ९४.८५ टक्के इतकं पूर्ण झालं आहे.