भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ
By यदू जोशी | Updated: February 18, 2025 07:16 IST2025-02-18T07:16:23+5:302025-02-18T07:16:43+5:30
सपकाळ हे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत असतानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली.

भाजपचे राजकारण जात अन् पैशांचे, त्याला छेदू : हर्षवर्धन सपकाळ
यदु जोशी
मुंबई : मी नेहमीच मूल्यांचे राजकारण केले आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही तेच करणार. प्रस्थापितांच्या गर्दीत मी टिकेल कसा असे काहीजण विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर माझ्या कृतीतूनच मिळेल. भाजपच्या पैशांच्या आणि जातीच्या राजकारणाचा आम्ही छेद करू, असे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.
सपकाळ हे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत असतानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली.
काँग्रेसमध्ये अनेक प्रस्थापित नेते आहेत, त्यांच्या गर्दीत आपला अभिमन्यू होईल, असे लोक म्हणताहेत, आपल्याला काय वाटते?
सपकाळ : तुम्ही म्हणता ते मीदेखील ऐकतो आहे; पण ‘कॅलॅमिटी मेकस् युनिटी’ म्हणजे संकटकाळात सगळे एक होतात हा सिद्धांत आहे. काँग्रेस आज संकटात आहे, त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी सगळेच नेते मला सहकार्य करतील, हा माझा विश्वास आहे.
तुम्ही हायकमांडचा माणूस आहात, सगळ्यांना तुमचे ऐकावेच लागेल ना?
सपकाळ : हायकमांडचे सगळेच असतात. मी प्रदेशाध्यक्षपद मागायला गेलो नव्हतो. नेतृत्वाने मला विचारले, मी होकार दिला. त्याचवेळी नेतृत्वाला मी हेही सांगितले की, माझ्या क्षमता आणि मर्यादा तुम्हाला माहिती आहेत. मर्यादांवर मात करत आणि क्षमता वाढवत मी संवैधानिक मूल्यांचे राजकारण करणार. या मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सक्षम वाटतात, अशांना मी माझ्या टीममध्ये घेणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे पुनरुज्जीवन होईल असे तुम्हाला वाटते का, तुमचा सामना तर बलाढ्य भाजपशी आहे ना?
सपकाळ : काँग्रेस आजही लाईव्ह आहे, थोड्या दुरुस्त्या कराव्या लागतील. समर्पित कार्यकर्ता आजही मोठ्या प्रमाणात आहे, नेत्यांनाही तसेच व्हावे लागेल. बलाढ्य शक्तींनाही पराभूत व्हावे लागले, हा जगाचा इतिहास आहे आणि भाजप त्याला अपवाद नाही. मला राज्यसभा, विधान परिषद काही नको, पण पाच वर्षांनंतर काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, हे माझे लक्ष्य असेल. मूल्याधारित राजकारणासाठी साथ देणारे सोबत येतील, ज्यांना मूल्यांचे पुनरुज्जीवन करायचे नाही त्यांनी राजकारण सोडलेले बरे.
भाजप हाच आपला मुख्य विरोधक आहे का?
सपकाळ : अर्थात. कारण देशात विचारसरणी बघता काँग्रेस व भाजप असे दोनच पक्ष आहेत. बाकी भाजपसोबत सगळ्या झुंडी आहेत आणि त्या सोईनुसार बदलतात. जातीय समीकरणे आणि पैशांच्या आधारेच राजकारण करणाऱ्या भाजपचा भयमुक्त राहून आम्हाला सामना करायचा आहे. जात व पैसा या दोन्ही घटकांचा वापर न करता आम्ही सडेतोड उत्तर देऊ. या लढाईत काँग्रेसचे सगळे नेते मला साथ देतील असा विश्वास आहे. जे लढतील ते टिकतील आणि पुढे जातील. माझ्याकडे पैसा नाही, मी संस्थानिक नाही. पक्षासाठी कफन बांध के निकला हूं.
मी सर्वोदय आश्रमातच नेहमी उतरत असतो
मुंबईला मोटारीने यायला निघालेले हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले, कोणत्या हॉटेलमध्ये असेल मुक्काम? त्यावर ते म्हणाले, ‘मी गिरगावच्या सर्वोदय आश्रमात थांबणार आहे, नेहमी मी तिथेच उतरतो’. सपकाळ यांचे हे उत्तर काँग्रेसमध्ये पंचतारांकित राजकारण्यांसाठी फारच सूचक वाटले.
आज पदभार स्वीकारणार
हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. बिर्ला मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम होईल.