जीएसटी उत्पन्नात घट हा भाजपचा दावा खोटा, हास्यास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:17 AM2021-09-05T07:17:37+5:302021-09-05T07:17:58+5:30

काँग्रेसने दिली आकडेवारी : कोरोना नसतानाही होती अधोगती

BJP's claim of reduction in GST revenue is false, ridiculous | जीएसटी उत्पन्नात घट हा भाजपचा दावा खोटा, हास्यास्पद

जीएसटी उत्पन्नात घट हा भाजपचा दावा खोटा, हास्यास्पद

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही (Ease of Doing Business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता, हा भाजप नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर २०१८ साली १३ व्या स्थानावर होता. कोरोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल, यात भाजप तरबेज असून, भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दीक्षा घेऊन  बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजप नेत्यांचे शिरोमणी आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

सावंत म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा जीएसटी उत्पन्नात ३७२८ कोटी रुपयांनी घट झाली आहे, असे दुसरे धादांत खोटे वक्तव्य भातखळकर यांनी केले आहे. प्रत्य़क्षात एप्रिलमध्ये राज्याचा जीएसटी १२,३५० कोटी रुपये, मे महिन्यात ७,९८३ कोटी रुपये, जूनमध्ये ८,३४९ कोटी रुपये, जुलैमध्ये ११,३८८ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये १२,६४४ कोटी रुपये असून, या कालावधीत एकूण ५२,७१४ कोटी रुपये उत्पन्न झालेले आहे.  जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात जीएसटी उत्पन्न वाढले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते, त्यात या वर्षी ६७.२९ टक्के वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP's claim of reduction in GST revenue is false, ridiculous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.