Join us

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:55 IST

तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा...शून्य अधिक शून्य हे शून्यच असते. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय झाला. कामगारांचा विजय झाला, भाजपाचा विजय झाला असं शेलारांनी सांगितले. 

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं बोललं जाते. या निवडणुकीपूर्वी बेस्ट कर्मचारी पतपेढी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती दिसून आली. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाच्या संघटनांनी एकत्रितपणे या निवडणुकीत २१ जणांचं पॅनेल उभे केले. मात्र या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. बेस्टचा निकाल हे शुभसंकेत असून मुंबई महापालिकेत आमच्या जय वीरूंसोबत ठाकरेंनी आधी लढावे मग मी आणि देवेंद्र फडणवीस आहोत असं सांगत शेलारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना टोला लगावला. 

बेस्ट निकालावर आशिष शेलार म्हणाले की, मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी यादी नंतर घोषित करेन पण मुंबई महापालिका निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो. या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवले आहे. त्यामुळे शोलेत जसे होते, तसे मुंबईच्या निवडणुकीत भाजपाचे जय वीरू म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी घोषित करतो. उबाठा आणि मनसेला सांगतो, पहिले या दोघांशी निपटा मग मी आणि देवेंद्र फडणवीसांचा विचार करा असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला.   तसेच भाजपा म्हणून आम्ही बेस्टच्या निवडणुकीत उतरलो नव्हतो कारण ही निवडणूक कामगारांची होती. बेस्टवर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याचे राजकीयकरण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीत राजकीय भूमिका मांडणं याचेच त्यांना फळ मिळाले आणि हातात भोपळा मिळाला. त्यामुळे तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा...शून्य अधिक शून्य हे शून्यच असते. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय झाला. कामगारांचा विजय झाला, भाजपाचा विजय झाला असं त्यांनी सांगितले. 

बेस्ट पतपेढी निवडणुकीत काय झालं?

मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे बेस्टची निवडणूक अधिक चर्चेत होती. या निवडणुकीत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात सहकार समृद्धी पॅनेल मैदानात उतरली आणि निवडणुकीत रंगत वाढली. मंगळवारी बेस्ट पतपेढीचा निकाल लागला तेव्हा ठाकरे बंधू यांच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. 

टॅग्स :भाजपाआशीष शेलारराज ठाकरेउद्धव ठाकरेप्रसाद लाडदेवेंद्र फडणवीस