"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

By मुकेश चव्हाण | Published: October 24, 2020 01:31 PM2020-10-24T13:31:25+5:302020-10-24T13:32:58+5:30

एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

BJP will not stop because of Eknath Khadse, said BJP leader Raosaheb Danve | "वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

Next

मुंबई: भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर त्याचा पक्षावर परिणाम होईल असंही बोललं जात आहे. मात्र एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानूसार, रावसाहेब दानवे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचं कसं होणार, असा प्रश्न अनेकांना पडायचा. भाजपामध्येही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर कोण, असा प्रश्न विचारला जायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्यानं भाजपा थांबलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या जाण्यानंही भाजपा काही थांबणार नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लाल दिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं," असंही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. 

४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजपा ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी तेही म्हणाले की, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जा, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: BJP will not stop because of Eknath Khadse, said BJP leader Raosaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.