Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 05:31 IST

नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा  उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - तब्बल ४४ वर्षांनी भाजपाचा दुसरा महापौर बुधवारी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार असून, महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्यावतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे. भाजपाच्या रितू तावडे या महापौर पदाच्या, तर शिंदेसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. महापौर निवडीनंतर तब्बल १ हजार ४३४ दिवस महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. सन १९८२मध्ये भाजपचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी पद भूषवले होते. 

नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा  उपस्थित राहणार आहेत.  महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज भरला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट आहे. या निवडणुकीस काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या विरोधी बाकांवरील नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत. 

सन १९८२ मध्ये भाजपाचे पहिले महापौर म्हणून प्रभाकर पै यांनी पद भूषवले होते. १९९६ सालापासून पालिकेत भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आहे. २०१७ सालच्या निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांत काडीमोड झाला. त्यानंतर म्हणजे २०२६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने पालिकेवर आपला झेंडा फडकावला. भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने साहजिकच त्या पक्षाचा महापौरपदावर दावा होता, तर हे पद आपल्याला मिळावे, असा शिंदेसेनेचा आग्रह होता. मात्र, भाजपाच्या संख्याबळापुढे अखेर त्यांना मान तुकवावी लागली आणि उपमहापौर स्वीकारावे लागले. भाजपाच्या रितू तावडे या महापौरपदाच्या, तर शिंदेसेनेचे संजय घाडी हे उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत. तावडे या पूर्व उपनगरातून, तर घाडी पश्चिम उपनगरातून निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी दोन्ही उपनगरांत सत्तेचा समतोल साधला आहे.

महापौर कोण, यावरून गाजलेली निवडणूक

'महापौर हिंदू मराठी की मराठी' या मुद्यावर पालिका निवडणुकीचा प्रचार रंगला होता. प्रारंभी, भाजपाने महापौर हिंदू मराठी असेल, अशी भूमिका घेतली होती, तर उद्धवसेनेने महापौर मराठीच असेल, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर महापौर मराठी असेल, असा प्रचार भाजपानेही सुरू केला होता.

असे आहे पालिकेतील संख्याबळ

भाजपा - ८९

शिंदेसेना - २९

उद्धवसेना - ६५

काँग्रेस - २४

एमआयएम - ८

मनसे - ६

राष्ट्र्रवादी (अप) - ३

समाजवादी पक्ष - २

राष्ट्रवादी (शप) - १

दोन्ही राष्ट्रवादींनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचे संख्याबळ ३३ झाले आहे.    

कुठे कोणत्या पक्षाचे झाले महापौर?छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २३ व्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर, तर उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ विजयी झाले. दोघांना प्रत्येकी ७० मते पडली. 

नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळे, तर उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची मंगळवारी निवड करण्यात आली.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नितीन पाटील, तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.  

सांगली :  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन मगदूम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. विरोधी काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Mayor in Mumbai After 44 Years; Administrative Rule Ends

Web Summary : Mumbai will have a BJP mayor after 44 years. Ritu Tawde is the mayoral candidate, and Sanjay Ghadi is the deputy. The administrative rule ends after 1,434 days. BJP's strength secured the mayoral position.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपादेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे