किरीट सोमय्यांनी दुसऱ्यांदा पक्षाचा आदेश नाकारला; प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:42 IST2025-12-08T16:34:24+5:302025-12-08T16:42:59+5:30
भाजपाच्या १४४ सदस्यांच्या समितीचा सदस्य होण्यास किरीट सोमय्यांचा नकार

किरीट सोमय्यांनी दुसऱ्यांदा पक्षाचा आदेश नाकारला; प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, कारण काय?
Kirit Somaiya: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई भाजपाचे १४४ सदस्यांचा समितीचे सदस्य म्हणून काम करण्यास नकार दिला आहे. यापू्र्वीही विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. विधानसभा निवडणुकीसाठी संपर्क प्रमुख म्हणून आपल्या नावाची घोषणा आपल्याला न विचारता केल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेत होता. त्यांनी पक्षाचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवेयांना पत्र लिहून ही पद्धत चुकीची आणि अमान्य असल्याचे सुनावले होते. त्यानंतर आता निवडणूक संचालन समितीचा सदस्य म्हणून काम करणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई भाजप अध्यक्षांनी सोमय्यांची "मुंबई भाजपाच्या १४४ सदस्यांच्या समितीचे सदस्य" म्हणून नियुक्ती केली आहे. ती नियुक्ती त्यांनी नाकारली आहे आणि 'मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमाने काम करत आहे, आणि करणार' असल्याचे त्यांना कळवले आहे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार, माझे नाव ह्या समिती मधून त्वरीत वगळावे. पद, समिती सदस्य नसताना मी पक्षाचे, निवडणुकीचे काम करणारच, असेही सोमय्या यांनी म्हटलं. बांगलादेशी मुक्त मुंबई हे लक्ष्य साकार करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.
मुंबई भाजप अध्यक्ष यांनी "मुंबई भाजपाचे 144 सदस्यांचा समितीचे सदस्य" म्हणून नियुक्ती केली, धन्यवाद.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 8, 2025
मी ते नाकारले आहे, मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमाने काम करीत आहे, करणार असे त्यांना कळविले आहे.
बांगलादेशी मुक्त मुंबई हे लक्ष्य साकार करणार@AmeetSatam@ShelarAshishpic.twitter.com/jlUuTowYZm
यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळीही किरीट सोमय्या यांनी पक्षाने दिलेली नवी जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. "निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता केली, ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. या समितीचा मी सदस्य नाही, पुन्हा अशी अवमानास्पद वागणूक देऊ नये," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी रावसाहेब दानवे आणि बावनकुळे यांना सुनावले होते.
पक्षाच्या कामापासून सोमय्यांचे अंतर?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधामुळे तिकीट नाकारल्यापासून सोमय्या सक्रिय राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीसे दूर होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करत विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. २०४ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, पण भाजपने मिहीर कोटेचा यांना संधी दिली. त्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने दिलेली महत्त्वाची जबाबदारी त्यांनी नाकारल्यामुळे, किरीट सोमय्या स्वपक्षावर नाराज आहेत की केवळ कार्यकर्ता म्हणून काम करणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.