भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:38 IST2025-11-06T13:37:29+5:302025-11-06T13:38:50+5:30
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता

भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेत प्रवेश केलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी पक्षाला रामराम केला आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तृप्ती सावंत यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
सावंत यांच्या पक्षप्रवेशावेळी अमित साटम म्हणाले की, माजी आमदार तृप्ती सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पुनश्च प्रवेश करत भाजपाच्या विकासयात्रेवर पुनश्च विश्वास दाखवला आहे. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा स्वीकार करणाऱ्या तृप्ती सावंत यांच्या नेतृत्वगुणांमुळे, जनसेवेसाठीच्या निष्ठेमुळे आणि समाजाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे पक्षाला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ प्राप्त होईल. विकास, पारदर्शकता आणि जनकल्याण या तत्वांवर आधारित भाजपा परिवारात त्यांच्या पुनरागमनाचे मनःपूर्वक स्वागत आहे असं त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेत प्रवेश
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि वांद्रे पूर्व मतदारसंघातून मनसेने त्यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी आणि उद्धव ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई रिंगणात होते. त्यात मनसेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिल्याने इथली लढत तिरंगी झाली होती. मात्र या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वरूण सरदेसाई आमदार म्हणून निवडून आले.
कोण आहे तृप्ती सावंत?
बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातच आहे. हा मतदार संघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचे दिवंगत बाळा सावंत यांचं या विधानसभेवर वर्चस्व होतं. तृप्ती सावंत या त्यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिले. त्यावेळी त्या निवडून आल्या. मात्र त्यानंतरच्या विधानसभेत तृप्ती सावंत यांना पक्षाने तिकीट नाकारले. तेव्हा तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात सावंत यांना २४ हजार ०७१ मतं मिळाली होती. मात्र त्यावेळी झिशान सिद्दिकी निवडून आले होते. मग तृप्ती सावंत यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा त्या भाजपात सामील झाल्या आहेत.