"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:55 IST2025-09-03T10:50:22+5:302025-09-03T10:55:21+5:30

केशव उपाध्ये यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

BJP spokesperson Keshav Upadhye thanked CM Devendra Fadnavis for handling Maratha Reservation issue | "आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार

"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार

Keshav Upadhye on Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपलं उपोषण सोडलं. गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होतं. सरकारच्या वतीने जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर जरांगे यांनी विजयी गुलाल उधळत आझाद मैदान सोडलं. या मागण्यांसदर्भात निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागून महत्वाची भूमिका निभावली. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महाराष्ट्रातील मोठा प्रश्न सन्मानजनक रीतीने मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्टमधून मराठा आंदोलक नेत्यांचेही यावेळी अभिनंदन केले. "मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. परंपरागत कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने कोणावरही अन्याय न होता अशा कुटुंबांना न्याय देणारा तोडगा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मोठा प्रश्न सन्मानजनक रीतीने मार्गी लावला याबद्दल त्यांचे अभिनंदन! राज्यातील प्रत्येकास न्याय मिळावा हा प्रत्येकाचा हक्क असून तो जपण्याची समंजस संवेदनशीलता त्यांनी दाखवली आणि आंदोलनाच्या नेत्यांनीही ती समजून घेतली याबद्दल त्यांचेही अभिनंदन," असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं.

"या आंदोलनाची दिशा भरकटवून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न स्वतःस जाणते मानणाऱ्या काही नेत्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या आडून आपल्या मतांचे आरक्षण करण्याचा काहींचा डाव होता. इतक्या संवेदनशील विषयावरही मविआतील नेते राजकारण करीत महाराष्ट्र तापवण्याचा प्रयत्न करूत होते. त्यांचे हे प्रयत्न तसेच घटनेत दुरुस्ती केल्याखेरीज तोडगा शक्य नाही असे सांगत हा तिढा केंद्र सरकारच्याही गळ्यात घालण्याचा त्यांचा धूर्त प्रयत्न फडणवीस यांनी हाणून पाडला. अन्यथा मार्ग निघाला नसताच, पण न्याय्य मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मराठा समाजातील पात्र कुटुंबांची फसवणूक झाली असती," अशी टीका उपाध्येंनी केली. 

उद्धव ठाकरे यांना या प्रश्नाचे फारसे ज्ञान नाही त्यामुळे सरकारला विरोध करण्याव्यतिरिक्त कोणतीच ठोस भूमिका न घेता त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. तसेही त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक प्रश्नांची जाण नाहीच. आपल्याला अर्थसंकल्प कळत नाही, ऊसाचे राजकारण माहीत नाही, शेतीतले काही समजत नाही अशा अनेक बाबतीत त्यांनी स्वतःच तशी कबुली दिली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात सरकारच्या विरोधात राहण्याव्यतिरीक्त कोणतीच भूमिका न घेऊन याही मुद्द्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे तीच कबुली दिली. एकंदरीत, महाराष्ट्रातील हा कळीचा मुद्दा, राज्य पेटविण्याचा प्रयत्न सुरू असताना यावर सन्मानजनक रीतीने मार्गी लावण्याचे श्रेय ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जाते, तसेच श्रेय, या प्रश्नात अकारण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांकडे लक्ष न देण्याचा समजूतदारपणा महाराष्ट्राने दाखविले त्या महाराष्ट्रातील जनतेला जाते, असेही केशव उपाध्ये म्हणाले.
 

Web Title: BJP spokesperson Keshav Upadhye thanked CM Devendra Fadnavis for handling Maratha Reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.