“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:42 IST2025-01-16T17:40:26+5:302025-01-16T17:42:51+5:30

BJP Pravin Darekar News: सैफ अली खान हल्लाप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते टीका करत असताना भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

bjp pravin darekar replied sharad pawar and sanjay raut over bollywood actor saif ali khan attack | “पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

BJP Pravin Darekar News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी मध्यरात्री अज्ञान हल्लेखोराने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर सैफ अली खान याने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. हल्लेखोर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवर अनेक वार झाले. पैकी दोन वार अतिशय गंभीर स्वरुपाचे होते. तातडीने सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान धोक्यातून बाहेर आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. कायदा सुव्यवस्था आणि गृहमंत्रालयावर टीका केली जात आहे. याला आता भाजपा नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

मुंबईतील कायदा सुव्यस्था किती ढासळत आहे, याचे हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दुसरा प्रयत्न. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृहखाते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावे, असे शरद पवार म्हणाले होते. तर, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचे स्वागत, निवडणूक, शिबिरे यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चालले आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले.

पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही

सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलीस तपास करत आहेत आणि लवकरच सत्य बाहेर येईल. परंतु, शरद पवार आणि संजय राऊत यांना लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते, याचे भान कदाचित संजय राऊतांना नसेल, पण शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ते असायला हवे, असे प्रत्युत्तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी यासंदर्भातील सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. याच्या पाठीमागे कशा प्रकारचा मोटिव्ह असू शकतो, हेदेखील पोलिसांनी सांगितले आहे. कुठून आले, ते सांगितले आहे. यावर पूर्ण कारवाई चाललेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशातील मेगासिटीमध्ये सर्वांत सुरक्षित मुंबई आहे. हे खरे आहे की कधी-कधी काही घटना घडतात, त्याला गांभिर्याने घेतले पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य नाही. यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होत आहे. मुंबई अधिक सुरक्षित राहिले पाहिजे, यादृष्टिने निश्चित सरकार प्रयत्न करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: bjp pravin darekar replied sharad pawar and sanjay raut over bollywood actor saif ali khan attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.