"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:04 IST2026-01-01T11:02:11+5:302026-01-01T11:04:13+5:30
मराठी महापौर न होण्यासाठी कृपाशंकर सिंह हे तर निमित्त असून भाजपच सूत्रधार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut on Kripashankar Singh: राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या एका विधानाने आता नवा वाद निर्माण झाला आहे. "मीरा-भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय करू," या त्यांच्या दाव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडाडून टीका केली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा भाजपचा अजेंडा असल्याचे म्हटले.
एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना कृपाशंकर सिंह म्हणाले की, "मीरा-भाईंदरसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता येईल. आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की, त्यातून उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवणे सहज शक्य होईल." उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे विधान केले असले तरी, त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत.
'हा तर भाजपचा अजेंडा'; संजय राऊत यांचा प्रहार
कृपाशंकर सिंह यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. "मुंबईत किंवा अन्य ठिकाणी मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. भाजपने त्यासाठी कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केली आहे तसं वातावरण तयार करण्यासाठी. भाजपचे हे कारस्थान आहे आणि ते आधी वातावरण निर्मिती करत आहेत. त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा हे त्यांनी ठरवलं आहे. कृपाशंकर यांचे वक्तव्य हे अनावधानाने केलेले नसून ही भाजपची रणनीती आहे. परप्रांतियांना शिवसेना, मनसे आणि मराठी माणसाविरोधात मतदान करण्यासाठी यातून जागं केलं जात आहे. कृपाशंकर यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, सम्राट चौधरी अशी लोकं इथे येणार," असं संजय राऊत म्हणाले.
"भाजप हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणार पक्ष नाही. ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभाग नव्हता, सीमाप्रश्नाच्या संघर्षात सहभाग नव्हता. हा पक्ष मराठी माणसाच्या बाजूने उभा राहिल याची कल्पनाच कोणी करु नये. हा एकमेव पक्ष आहे ज्याचा मराठी माणसाच्या लढ्यामध्ये सहभाग नव्हता. त्यामुळे कृपाशंकर यांच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर होणार नाही यासाठी भाजपची कटकारस्थाने सुरु झाली आहेत," असेही राऊत यांनी म्हटलं.