धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 06:52 IST2025-10-26T06:51:51+5:302025-10-26T06:52:05+5:30
एकजूट होऊन मुंबईकरांनी उत्तर दिले पाहिजे

धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना जातीय व धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबविण्याचा भाजपचा डाव आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी शनिवारी केली.
भाजप महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाले. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. प्रदूषण वाढले आहे. वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे. ११ वर्षांपासून केंद्रात आणि आता राज्यातही भाजपाचे सरकार असतानाही मुंबईत विकासकामांच्या नावाने बोंब आहे. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे भाजप महायुती देणार की नाही, असा सवालही खा. गायकवाड यांनी उपस्थित केला.
एकजूट होऊन मुंबईकरांनी उत्तर दिले पाहिजे
लाडके बिल्डर व उद्योगपती मित्रांना मुंबईकरांच्या हक्काच्या जागा कवडीमोल भावाने देण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. आता महापालिका निवडणुकीत द्वेषाचे राजकारण ते खेळत आहेत. कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है या भाजपच्या प्रचाराला बळी पडून मुंबईला लूट देऊ नका. त्याला एकजूट होऊन मुंबईकरांनी उत्तर दिले पाहिजे. मुंबईला भाजपपासून वाचवून महापालिकेत बदल घडविण्याचे आवाहनही खा. गायकवाड यांनी केले.