'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:00 PM2022-08-31T17:00:57+5:302022-08-31T17:01:31+5:30

भविष्यात छत्रपतींचा महाराष्ट्र सुखी समाधानी ठेवता येईल असा कारभार सरकारकडून होईल असं त्यांनी म्हटलं. 

BJP Narayan Rane's warning to Shivsena Uddhav Thackeray | 'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा 

'ती' केस संपली नाही; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा 

Next

मुंबई - गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं आहे. आता महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर घोडदौड करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लोकांवर अन्याय होणार नाही. त्यांना न्याय मिळेल. स्त्रीयांवर तर नाहीच नाही. सुशांत आणि दिशावर अत्याचार करून ठार मारण्यात आले. गच्चीवरुन फेकण्यात आले. असे प्रकार यापुढे होणार नाहीत. प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सुशांत आणि दिशाची केस संपली नाही. भविष्यात असं घडू नये असं शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्न करेल अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. 

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यात गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज श्रीगणेशाचं आगमन झालंय. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात आनंदाचं वातावरण आहे. सालाबादप्रमाणे आम्ही गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा आमच्या कुटुंबात अधिराजनं आणली. त्याने घरी गणपती बसवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही इथं घरी गणेशोत्सव साजरा करू लागला.  राज्यातील साडे तेरा कोटी जनता सुखी समाधानी राहावी. त्यांना सुरक्षा मिळावी. भविष्यात छत्रपतींचा महाराष्ट्र सुखी समाधानी ठेवता येईल असा कारभार सरकारकडून होईल असं त्यांनी म्हटलं. 

मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार 
मुंबई महापालिका अनेक वर्ष ज्यांच्या हाती आहे त्यांनी स्वच्छ, सुंदर मुंबई बनवली नाही. बकाल मुंबई बनवली. टक्केवारीनं मुंबईचं शोषण केले. विकासाच्या कामात, साफसफाईच्या कामात, नालेसफाईत टक्केवारी खाल्ली. राज्यात गणपती येण्यापूर्वी राज्यातील सत्ता गेली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तन होईल. भाजपाची नक्कीच सत्ता येईल. मुंबईत भाजपाचा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला. 

उद्धव ठाकरे सरपंच होण्याच्या लायकीचे नाहीत  
उद्धव ठाकरेच कंत्राटी मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात नोंद घेतली इतक्या अपमानित पद्धतीने कुणाला पायउतार व्हावं लागलं नसेल. घरात बसून मुख्यमंत्रिपद सांभाळायचे. अडीच वर्षात मंत्रालयात ३ तास गेले. ही कारकिर्द. राज्यातील जनतेला काय मिळालं? मराठी माणसाला काय दिले? हिंदुत्वासाठी काय केले? उद्धव ठाकरेंना निवृत्ती मिळालीय आता गपचुप घरी बसा. तुम्हाला जे काही मिळाले हे साहेबांच्या नावावर मिळाले. उद्धव ठाकरे हे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत असा घणाघात नारायण राणेंनी केला. 

रश्मी ठाकरेंच्या नातेवाईकांना सांभाळलं
शिवसेनेत नेतृत्त्व, नेते कुठे आहेत. बाळासाहेबांसाठी जीव अर्पण करणारे शिवसैनिक होते. त्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाही. केवळ रश्मी ठाकरेंचे नातेवाईक इथपर्यंतच त्यांना सांभाळता आले असं सांगत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

Web Title: BJP Narayan Rane's warning to Shivsena Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.