Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राणे नावाने शिवसेना घाबरते; पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 10:42 IST

नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.  भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करुन शिवसेनेवर टीका केली आहे

मुंबई: राज्यात शिवसेना आणि भाजपामधील द्वंद्व काही केल्या थांबताना दिसत नाही. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुंबईत भाजपानंशिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसैनिक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. मोर्चा संपल्यानंतर परत जाताना काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. 

शिवसेना भवन हे आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढायचा नाही, असं खासदार संजय राऊत यांनी भाजपाला म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

भाजपा कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर नितेश राणे म्हणाले, "जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचे उद्धव ठाकरे आमच्या पंतप्रधान मोदींसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात?, असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं देखील नितेश राणे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. 

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना भवनासमोर राडा झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला गुंडा पार्टी म्हणून संबोधले होते. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.

अजित पवार म्हणाले…

राऊत यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत, असं पवार म्हणाले

टॅग्स :नीतेश राणे शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरे