"दादा, नाना जागे व्हा! भावी महिला मुख्यमंत्री लॉन्च करण्यासाठी आजचा हल्लाबोल मोर्चा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:44 IST2022-12-17T19:35:26+5:302022-12-17T19:44:21+5:30
मुंबई-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला.

"दादा, नाना जागे व्हा! भावी महिला मुख्यमंत्री लॉन्च करण्यासाठी आजचा हल्लाबोल मोर्चा"
मुंबई-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विटरवरुन टीका केली आहे.
महाविकास आघाडीच्या या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी झाले. यात शिवसेनेकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सहभागी झाले होते, यावरुन आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.'आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लॅांच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? …दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा'अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
मविआचा महामोर्चा राजकीय मोर्चा
महाविकास आघाडीचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते मोर्चा काढतात. दररोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतो, तसा हा मोर्चा नॅनो होता. उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही, अशा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लॅांच करण्यासाठी होता की महाराष्ट्रहितासाठी होता? …दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा @OfficeofUT@MahVikasAghadi
— nitesh rane (@NiteshNRane) December 17, 2022
या मोर्चात आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेसच्या वतीने नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले होते.