Join us
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणे यांनी केला अटकपूर्व जामीनासाठी अर्ज; उद्या होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:28 IST

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मुंबई: भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी अटकेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. 

नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांची फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे- केंद्रीय मंत्री नारायण राणे

नितेश राणेंनी काय केले आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

नेमके प्रकरण काय?-

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. 

पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :नीतेश राणे भाजपापोलिसदेवेंद्र फडणवीस