"भाजप नेत्यांनी सूडाच्या राजकारणापेक्षा नितीन गडकरी यांच्या आदर्शावर काम करावे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 20:25 IST2022-03-30T20:25:09+5:302022-03-30T20:25:33+5:30
सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या यांनी गल्लीतील भांडणखोर मुलांसारखी भूमिका वठवायला सुरुवात केली आहे असा टोला राष्ट्रवादीनं लगावला आहे.

"भाजप नेत्यांनी सूडाच्या राजकारणापेक्षा नितीन गडकरी यांच्या आदर्शावर काम करावे"
मुंबई - महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सूडाचे राजकारण बंद करून त्यांचे नेते नितीन गडकरी यांचा आदर्श घेऊन काम करावे असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काढला आहे.
लोकशाही टिकण्यासाठी देशात कॉंग्रेससारखा विरोधी पक्ष हवा असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. नितीन गडकरी यांचे वक्तव्य हे राजकारणातील मुरब्बी व खिलाडूवृत्तीच्या नेत्याचे आहे. विरोधक आक्रमक असेल तर चांगले काम करता येते परंतु विरोधकच संपले तर काय स्पर्धा करणार हेच नितीन गडकरी यांना सांगायचे आहे असेही क्लाईड क्रास्टो म्हणाले.
सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या यांनी गल्लीतील भांडणखोर मुलांसारखी भूमिका वठवायला सुरुवात केली आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करायला त्यांना वेळ नाही. उठसूठ राज्यसरकारवर प्रहार करायला आणि सत्ता घालवण्याचा हाच उद्योग त्यांनी सुरू केला आहे असेही क्लाईड क्रास्टो म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी हे पवारसाहेबांच्या कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल करत आहेत. पवारसाहेबांच्या कामाचा प्रभाव त्यांच्यावर पडल्याचे ते सांगत आहेत त्यामुळे फडणवीस, चंद्रकांत पाटील पडळकर तुम्ही गलिच्छ टिकाटिपणी करण्यापेक्षा नितीन गडकरी यांचा आदर्श घेऊन काम करावे नाहीतर राजकारणात तुम्हाला भविष्य नाही असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.