'भाजपचे बडे नेते समीर वानखेडेला भेटायला जातात, राक्षसी विचारांचे हे लोक घाबरले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 17:12 IST2021-10-29T17:05:25+5:302021-10-29T17:12:23+5:30
महाराष्ट्रातील जनतेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्या दिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले

'भाजपचे बडे नेते समीर वानखेडेला भेटायला जातात, राक्षसी विचारांचे हे लोक घाबरले'
मुंबई - जो जीन आहे (भूत) त्याचा जीव एका पोपटात होता, तो हाच पोपट तुरुंगात जाणार असल्याने जे राक्षसी विचाराचे भाजपचे लोक आहेत ते घाबरले आहेत, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. आपलं प्रकरण बाहेर येवू नये यासाठी भाजपवाले धडपड करत असल्याचा आरोपही मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज केला.
महाराष्ट्रातील जनतेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्या दिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. हे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे. मी आज नाव घेत नाही परंतु भाजपचे मोठमोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात समीर वानखेडेला भेटायला जात आहेत. भाजपचे काही नेते त्यांचे राईटहँड समीर वानखेडेला भेटत आहेत हे जबाबदारीने सांगत असल्याचे सांगताना कालपासून या हालचाली वाढल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव
राज्यातील सरकारला, मुंबईला, बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज नोएडामध्ये एक बॉलिवूड निर्माण करत आहेत. त्यांना वाटतंय की बॉलीवूडला बदनाम केले की बॉलिवूड बाहेर जाईल. परंतु त्यांना माहीत नाही बॉलिवूड बनवण्यासाठी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम व काही मराठी कलाकार व दिग्दर्शकांनी ओळख दिली आहे. बॉलिवूड देशाची संस्कृती व ओळख संपूर्ण जगात घेऊन जात आहे. बॉलिवूडच्या गाण्यातून लोक भारतदर्शन करतात. बॉलिवूडच्या माध्यमातून राज्यात, मुंबईत लाखो लोकांचा रोजगार चालतो. बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज जर 'युपीवूड' करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील, असेही मलिक यांनी म्हटले.
काय म्हणाले फडणवीस
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असंही फडणवीस म्हणाले. त्यानंतर, मलिकांनी भाजपला लक्ष्य केलंय.