भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 06:35 IST2025-11-23T06:35:31+5:302025-11-23T06:35:55+5:30
कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये, पण, भाषिक प्रांतवाद भाजपनेच सुरू केला आणि खापर मात्र आमच्यावर फोडताहेत असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबई - आधी पक्ष फोडले, आता घरेही फोडण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. त्यांच्या हिंदुत्वाचा फुगा फुटल्याने ते आता भाषिक प्रांतवाद पेटवत आहेत. भाषेवरून कुणाला मारावे, ही आपली भूमिका नाही. भाषिक प्रांतवादाचे विष भाजप पसरवत आहे अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.
शिंदेसेनेच्या दहिसर व बोरिवली येथील पदाधिकाऱ्यांनी तर डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर यांनी 'मातोश्री' येथे उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा ढोंगी असल्याचे लक्षात येत असल्याने जे गेले ते परत येत आहेत. ही लढाई सोपी नाही. रोजच्या प्रवेशामुळे 'मातोश्री'चा परिसर गर्दीने गजबजतो. पण, ही गर्दी नाही, तर लढणाऱ्या शिवसैनिकांचे सैन्य आहे असे ते म्हणाले.
'तोडा, फोडा आणि राज्य करा' हा त्यांचा अजेंडा
'मागोठाणेमध्ये मराठी माझी आई आहे. आई मेली तरी चालेल,' असे बोलणाऱ्याचे काय करायचे? घाटकोपरमध्ये संघाचे जोशी माझी मातृभाषा गुजराती असल्याचे बोलतात. हे भाषिक प्रांतवादाचे विष भाजपच पसरवत आहे. 'तोडा, फोडा आणि राज्य करा,' हा त्यांचा अजेंडा आहे पण यातून भूमिपुत्रांनी एकत्र राहून राज्य सांभाळायचे आहे. कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये, पण, भाषिक प्रांतवाद भाजपनेच सुरू केला आणि खापर मात्र आमच्यावर फोडताहेत असा आरोपही त्यांनी केला.