Join us  

"'मातोश्री'विरुद्धच्या बंडासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती सगळ्यांना माहीत आहे!"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 1:51 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्र लिहून शिवसेनेच्या टीकेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून झालेल्या बोचऱ्या टीकेमुळे संतापलेले भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्र लिहून शिवसेनेच्या टीकेवर निशाणा साधला आहे. 

राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले की, मी आपल्या कृपेनं राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला नगरच्या जनतेनं खूप काही दिलं आहे. आपची बांधिलकी त्या जनतेशी आहे, आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही, असा टोला राधाकृष्ण विखे- पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या बंडासाठी संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप देखील केला आहे. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि वेळेवर कोणी यू-टर्न घेतले, हा इतिहास लोकांना माहिती आहे. मी त्याविषयी वेगळे काय सांगणार, असा खुलासा राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला आहे.

काय म्हटले होते सामनाच्या अग्रलेखात- 

संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत.

विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपवर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे.

फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली असूनही त्यांची टुरटुर सुरू आहे. 

काय आहे थोरात- विखे प्रकरण- 

विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.  उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सरकारच्या कामकाजाबाबत आमची कसलीही नाराजी नसून महाविकास आघाडी भक्कम आहे. हे सरकार पाच वर्ष चांगले काम करेल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानावर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती.

 सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आणि मंत्र्यांना कोणीही विचारत नाही. परंतु तरीदेखील काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. त्यामुळे मी एवढी वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष कधीच पाहिले नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्याचप्रमाणे एवढा अपमान होऊनही काँग्रेस सत्ता सोडेल, अशी अपेक्षा यांच्याकडून करता येणार नाही असं मत देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेवर बाळासाहेब थोरात यांनी देखील पलटवार केला आहे.  काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या पाच वर्षात कसे वागले. हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टॅग्स :राज ठाकरेसंजय राऊतशिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकारराधाकृष्ण विखे पाटील