Maharashtra Political Crisis: “शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव, संजय राऊतांचे तेच मिशन होते का?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:42 IST2022-07-06T14:38:02+5:302022-07-06T14:42:47+5:30
Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली आणि पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला, असा मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis: “शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव, संजय राऊतांचे तेच मिशन होते का?”
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. रिक्षावाला-मर्सिडीज यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपनेही यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधत, शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोबत घेतले का, अशी शंका भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केली आहे.
हा नियतीचा खेळ आहे. बाळासाहेबांचा मूळ कार्यकर्ता रिक्षावाला, पान-टपरीवाला मुख्यमंत्री, मंत्री झाला. एवढे मोठे बंड होऊनही ते आपल्या अय्याशी संस्कृतीत वावरत असतील, तर ते मोठे दुर्दैव आहे. या राज्यात मर्सिडीजपेक्षा रिक्षाला जास्त महत्त्व आहे, याचे भान नसल्यामुळे ही अशा प्रकारची परिस्थिती आली आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव
शिवसेनेतील आमदारांनी उठावच केला आहे. आम्हीही त्याला बंड मानत नाही. कारण त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. मात्र, शिवसेनेचे स्वरुप बदलले आहे. संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधून ठेवला आहे. म्हणूनच असंतोष वाढला. म्हणूनच बंडखोर आमदारांनी संजय राऊतांबद्दल केलेली वक्तव्ये ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत यांचे मिशन होते का, शरद पवार यांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव होता का, असे म्हटल्यास वावगे ठरू नये किंवा ही शंका येण्यास वाव आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, शिवसेना ही रस्त्यावर कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मोठी झाली. त्यात कोण रिक्षावाला होता, पान-टपरीवाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी छोट्यातील छोट्या माणसाला जाती-पातीच्या पलीकडे जाऊन मोठे केले. मात्र, यानंतर मर्सिडीज संस्कृती आली आणि याच संस्कृतीने शिवसेनेचा घात केला, असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी सोडले.