"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:44 AM2022-05-24T10:44:22+5:302022-05-24T10:46:39+5:30

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

BJP leader Praveen Darekar has criticized CM Uddhav Thackeray. | "संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

"संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान"

googlenewsNext

मुंबई-  राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारावरून शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यातील तिढा कायम आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सोमवारी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. शिवबंधन बांधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार नाही, या आपल्या भूमिकेवर संभाजीराजे ठाम राहिल्याने शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.  

संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश केल्यास उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. शिवबंधन बांधण्यासाठी ‘मातोश्री’वर या, असा निरोपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने संभाजीराजे यांना दिला होता. त्यासाठी दुपारी साडेबारापर्यंतची मुदतही दिली होती. संभाजीराजे यांनी पक्षप्रवेश न केल्यास सायंकाळपर्यंत शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करील, असेही सांगितले होते. संभाजीराजे यांनी मात्र ‘मातोश्री’वर न जाता कोल्हापूरला जाणे पसंत केले. 

सदर राजकीय घडामोडींवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. संभाजीराजे हे छत्रपतींचे वारसदार आहेत. त्यांना एखाद्या शिवसैनिकाप्रमाणे वेळ देऊन शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणे म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना अनन्यसाधारण असं श्रद्धेचं स्थान महाराष्ट्रातील जनतेने दिल्यामुळे त्यांना उमेदवारी द्यायची की नको हा शिवसेनेचा विषय आहे. मात्र संभाजीराजेंना १२ वाजेपर्यंतचा वेळ देणं हि बाब महाराष्ट्रातील जनतेला आवडली नाही, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या संभाजीराजे यांनी ४२ मतांची तजवीज केली का, असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, शिवसेना दोन जागा लढवेल. राजेंना आमचा विरोध नसल्याचे सांगतानाच शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून लढण्याची तयारी-

शिवसेना पक्षप्रवेशाऐवजी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ना पक्षप्रवेशाचा सोहळा झाला, ना उमेदवारीची घोषणा झाली. दोन्ही बाजूंनी चर्चेची दारे पूर्ण बंद झालेली नाहीत.

Web Title: BJP leader Praveen Darekar has criticized CM Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.