Join us  

"काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्यांचे; जे कधी नाही झालं, ते सगळं होत आहे"

By मुकेश चव्हाण | Published: October 12, 2020 3:29 PM

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरांत वीज पुरवठा खंडित झाला होता. इतका वेळ वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे. अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्यानं लोकलसह, परीक्षांवरही परिणाम झाला. मुंबईत उद्बवलेल्या या परिस्थीतनंतर भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकाराचे नियोजन शून्य असल्याची टीका केली होती. याचदरम्यान आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले की, काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे . आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. त्यामुळे आता ते ही कदाचित दिसतील, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाले. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने सुरु आहे. तसेच, काही भागांत वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत दिल्या सूचना-

वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत उद्धव ठाकरे यांनी नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीजपुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :उद्धव ठाकरेवीजमुंबईनीतेश राणे भाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारनितीन राऊत