Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane: अँजिओ करताना मला मारून टाकण्याचा प्लॅन होता; नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 08:48 IST

कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

मुंबई- कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहात बोलत होते. 

नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत चांगलेच राजकारण रंगले होते. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

दिशाची आत्महत्या नाही, ती हत्या आहे- नितेश राणे

रात्री अडीच वाजता मला अटक करायला आले होते असं सांगत आमदार नितेश राणे म्हणाले की, माझी शुगर लेव्हल कमी होत होती. तरीही मला पोलीस अटक करण्यासाठी येत होते. दिशा सालियनची आत्महत्या असेल तर मग सीसीटीव्ही का गायब केले. त्या ठिकाणचा वॉचमन गायब झाला, वहीची पाने गायब झाली. रोहन रॉय गायब आहे. दिशाची आत्महत्या नाही, ती हत्या आहे. 

माझ्याकडे एक पेनड्राईव्ह-

माझ्याकडे पेन डाईव्ह आहे तो मी न्यायालयात देणार असंही आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही सिद्ध करू शकतो. ८ तारखेच्या रात्री राज्यातला एक मंत्री त्या पार्टीत होता. त्याचे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात देऊ, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :नीतेश राणे भाजपाकोल्हापूर