Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

By मुकेश चव्हाण | Updated: November 29, 2020 08:48 IST

नितेश राणे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली.

मुंबई/हिंगोली: शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आता प्रताप सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

नितेश राणे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे, असं नितेश राणे यांनी सांगितले. 

संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. 

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; संजय राऊत आक्रमक

कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका त्यांनी केली.

आता नको, पुढच्या आठवड्यात चौकशी करा- प्रताप सरनाईक

सध्या मी कोविड-१९ नियमानुसार क्वारंटाईन आहे. त्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. प्रताप सरनाईकांच्या या विनंतीनंतर 'क्वारंटाईन झाल्यानंतर हजर राहा', असा आदेश प्रताप सरनाईकांना ईडीकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :संजय राऊतनीतेश राणे शिवसेनाभाजपाअंमलबजावणी संचालनालय