Join us
Daily Top 2Weekly Top 5

"लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 14:16 IST

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे.

मुंबई: राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. मात्र देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

शरद पवार हे चीन ते महाराष्ट्रातील घडामोडींबाबत जोरदार बोलल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारमध्ये सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन दिवसांत अचानक रद्द करण्यात आल्या. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याचे बोलले जात होते. त्यातच पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी बारामती गाठत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे देखील ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पवारांकडे पारनेरचे नगरसेवक परत द्या, असे सांगितल्याचे समजते. या सगळ्या राजकारणावरून ठाकरे सरकार पडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. नेमक्या याच वेळी संजय राऊतांनी पवारांच्या मुलाखत घेतल्याचे जाहीर केल्याने सरकारमध्ये आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

टॅग्स :शरद पवारसंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपानिलेश राणे