Join us

ह्या माणसाला कुणीतरी च्यवनप्राश द्या; उद्धव ठाकरेंवर 'प्रहार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:20 IST

कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही?

मुंबई:  नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला होता. राज्यापालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षा सारखे असल्याचे सांगत महाविकासआघाला टोला लगावला होता. यावर गरिबांना बुलेट ट्रेन नाही तर रिक्षाच परवडत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांनी अभिभाषणात विविध मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी बेळगाव, कारवार सीमाप्रश्नांवर देखील  विरोधकांना सुनावले होते. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र राज्यात कधी येणार? तिथले लोक हिंदू नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे म्हणाले की, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा विषय भाषेचा आहे, धर्माचा नाही. काही माणसांचं वय वाढलं तरी त्यांना अक्कल येत नाही. त्यामुळे कोणीतरी या माणासाला च्यवनप्राश द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुप्रीम कोर्टात कर्नाटक- महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? जर तुम्हाला देशातील हिंदूंना न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या हिंदूंना घ्यावं हे म्हणण्यास काय अर्थ आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा शब्दप्रयोग करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न करुयात असं आवाहन केलं त्याचसोबत बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का? सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

टॅग्स :उद्धव ठाकरेनिलेश राणे महाराष्ट्र सरकारशिवसेनाकर्नाटकभाजपा