Join us
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, १०० रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:15 IST

राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग असून एक मोठं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अशाच पद्धतीचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे. राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग असून एक मोठं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

"गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, महापालिकेमध्ये १०० बिल्डरची यादी, १०० आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे नावा व्यक्ती हा आव्हाडांचा राईट हँड गेले काही महिने वसुली गँग चालवत आहे", असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट करुन माहिती दिली आहे. 

गृहनिर्माण विभागातील वसुली रॅकेट संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचीही माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पोलिसांकडे या संपूर्ण वसुली रॅकेट संदर्भात पुरावे देखील सादर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

१०० रुपये प्रति स्वेअरफूटचा भाव?राज्यात सध्या १०० रुपये प्रति स्वेअरफूट असा एसआरए, म्हाडा आणि बिल्डरांसाठी दर चालत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. "गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात", असं सोमय्या म्हणाले.  

टॅग्स :किरीट सोमय्याजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसअनिल देशमुखम्हाडा