BJP leader Chandrakant Patil has criticized Chief Minister Uddhav Thackeray | 'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका

'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका

मुंबई: शिवसेनेसोबत आता जाणार नाही. शिवसेनेबद्दल कटूता नाही. मात्र आम्हाला राष्ट्रवादीही नको आणि शिवसेनाही नको. आता आम्हाला आमची ताकद पाहायची आहे. आमचं संघटन मजबूत झालं आहे, हे माझं मत आहे. तरीही याबाबत काही निर्णय घेण्याची वेळ आली तर तो केंद्रीय नेतृत्व घेईल, असं विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते, प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धव ठाकरेंना या प्रश्नांचा अभ्यास नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे हे ही माहित नव्हतं. कामकाज कसं होतं हे माहित नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं त्यांचं कौशल्य खरोखर मोठं आहे. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. मात्र शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळेंनाच करतील, असं माझं विश्लेषण आहे. ते चुकीचंही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे- नितीन राऊत

 वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. त्यानंतर वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीजबिलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु असल्याची माहिती देखील नितीन राऊत यांनी यावेळी दिली. 

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिलं भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा सवालही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP leader Chandrakant Patil has criticized Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.