Join us  

'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 11:49 AM

'सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली'

मुंबई : मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाकडूनराहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यातच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

"नाही धार 'सच्चाई'कारांच्या शब्दांना आज दिसली, 'रोखठोक'लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली. सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली. नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली. मराठी बाणा सांगणारी सेना, सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!", असे ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

दुसरीकडे, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरुन ट्विवटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेच्या नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपाची लाचारी केली आता काँग्रेसची करत आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची”, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया सुरु असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपाने राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दिल्लीतील एका सभेत राहुल गांधी यांनी "माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही," असे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वच स्तरातून राहुल गांधींवर टीका होत आहेत.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेदेखील राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत तणाव निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय, या वक्तव्यावरून भाजपा राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. 

टॅग्स :आशीष शेलारभाजपाशिवसेनामनसेकाँग्रेसराहुल गांधी