“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:44 IST2025-09-02T13:41:33+5:302025-09-02T13:44:28+5:30

Manoj Jarange Patil Maratha Morcha In Mumbai: ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

bjp keshav upadhye reaction on maratha reservation morcha protest in mumbai and appeal to manoj jarange patil | “बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?

“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?

Manoj Jarange Patil Maratha Morcha In Mumbai: मराठा समाजबांधवांना हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता येईल, मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल, याचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या अटींचे प्रथमदर्शनी उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना चांगलेच खडसावले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लगेच मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. न्यायालय आणि पोलिसांनी आंदोलन करण्यासाठी दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली असून, त्यांना लवकरात लवकर आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या विधानांची पोलिसांनी दखल घेतली आहे. तसेच नोटीसमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. यानंतर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मनोज जरांगे यांना आंदोलन थांबवून सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

जबाबदारी झटकता येईल, पण वस्तुस्थिती बदलणार नाही

बस… आता थांबा जरांगेजी! ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले ४/५ दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही. प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. म. गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. मराठा समाजाच्या वेदना आपण सगळ्यासमोर आणल्यावर मराठा समाजाला आता १० टक्के आरक्षण सध्या लागू झाले आहे, असे उपाध्ये यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा

आता वेळ आहे थांबण्याची!.. आपल्या बहुतांशी मागण्या महायुती सरकारने पूर्ण केल्या आहेत. राहिला प्रश्न, ओबीसी कोट्यातून आरक्षण घेण्याचा. भाजपाची भूमिका तर स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का  न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. पण यावर आपल्यासोबत असण्याचा दावा करणारे मविआतील घटक पक्ष, शरद पवार, व काँग्रेसची यावर काय भूमिका आहे ते स्पष्ट विचारा. उद्धव ठाकरेंना या प्रश्नातले फारसे ज्ञान नसल्याने ते मूग गिळून बसतील, पण मविआतील ही मंडळी केवळ गोल-गोल करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा, दोन समाजसमूहांना झुंजत ठेवून मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या, आणि आपल्या आंदोलनात आपल्या खांद्यावरून कुणी मतांची बेजमी करण्याच स्वप्न पहातेय ही नामुष्की टाळण्यासाठी आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा!, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: bjp keshav upadhye reaction on maratha reservation morcha protest in mumbai and appeal to manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.