Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 19:54 IST2025-10-02T19:53:52+5:302025-10-02T19:54:20+5:30
Uddhav Thackeray at Dasara Melava : "अमिबा पोटात गेल्यास पोट बिघडते, तसे भाजपचे लोक..."

Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
Uddhav Thackeray at Dasara Melava Speech: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध गोष्टी घडत आहेत. एकीकडे राज्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे, तर दुसरीकडे सरकारवर टीका केली जात आहे. आज विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवतीर्थ येथे झाला. त्यावेळी उद्धव यांनी भाजपावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावरून टीकास्त्र सोडले. तसेच, भाजपाच्या राजकीय वृत्तीची अमिबा या एकपेशी जीवाशी तुलना केली.
भाजपा म्हणजे अमीबा
"भाजपा म्हणजे आता अमिबा झाला आहे. तो एक पेशी प्राणी असतो. तो वाटेल तसा वेडावाकडा कसाही पसरतो. त्याप्रमाणेच भाजपदेखील मिळेल तिकडे युती करत सुटली आहे. त्यांचे लोक शक्य तिकडे आपला विस्तार करत आहेत, पण एकपेशी आहेत. म्हणजेच इतर कोणालाही शिल्लक ठेवायचे नाही, फक्त मीच शिल्लक राहणार असा त्यांच्या अजेंडा आहे. तसेच अमिबा शरीरात गेल्यास पोट बिघडते, त्याप्रमाणे हे लोक समाजात घुसल्याने समाजातील शांती नाहीशी होत आहे. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो," अशी टीका उद्धव यांनी भाजपावर केली.
पंतप्रधान मोदींवरही टीकास्त्र
"भाजप आणि प्रशासन यांचा काहीही संबंध नाही. तीन वर्ष मणिपूर जळत आहे. पण मोदी आत्ता मणिपूरला गेले. आम्हाला वाटले होते की तेथे जाऊन ते तेथील पीडितांशी संवाद साधतील, पण तिकडे जाऊन मोदी म्हणाले की मणिपूर या नावामध्ये मणी आहे. तुम्हाला मणिपूर या शब्दातील मणी दिसला पण तिकडच्या लोकांच्या डोळ्यात असलेले पाणी दिसले नाही हे दुर्दैव आहे," असेही ठाकरे कडाडले.