'कबुतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न’, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:08 IST2025-08-06T18:07:41+5:302025-08-06T18:08:15+5:30
Harshwardhan Sapkal News: मुंबईमध्ये कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादामागे भाजपा युती सरकारच असून, राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचं प्रश्न दुसरीकडे वळवण्यासाठी या वादाला सरकार या वादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

'कबुतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न’, काँग्रेसचा दावा
मुंबई - मुंबईमध्ये कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादामागे भाजपा युती सरकारच असून, राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचं प्रश्न दुसरीकडे वळवण्यासाठी या वादाला सरकार या वादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
कबुतरांच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकारवर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कबुतरांमुळे फुप्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून न्यायालयाने ते हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे कबुतरखाने हटवू नका अशी मागणी जैन समाजातून होत आहे. नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पण सरकार जाणीवपूर्वक अशा वादाला खतपाणी घालत आहे. भाजपा युती सरकारचे काम म्हणजे आजारापेक्षा उपचार भयंकर असे आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे, तरुण मुलामुलींना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकारच असे वाद उकरून काढत आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून वादात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा आदर्श घालून द्यावा, असा टोला सपकाळ यांनी लगावला. एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, दादरच्या कबुतरखाना येथे झालेल्या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे सांगितले जात आहे पण हा सुद्धा बनाव आहे. राज्यात कोठेही काहीही घटना घडली की बाहेरच्या लोकांनी ती घडवून आणली हे ठोकळेबाज उत्तर देऊन सरकार आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बेस्ट प्रशासनाचा अतिरिक्त कारभार एकनाथ शिंदे यांनी अश्विनी जोशी यांच्याकडे दिला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आशिष शर्मा यांची नियुक्ती केली यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अधिका-यांच्या बदल्यांवरून गॅंगवार सुरु आहे. एका पदासाठी, एकाच दिवशी फडणवीस व शिंदे यांनी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मलाईदार पदावर ‘आपलाच माणूस’ बसविण्यासाठी सुरु असलेला हा संघर्ष पाहता सरकार आहे की टोळीयुद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.