मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:27 IST2025-12-19T12:27:03+5:302025-12-19T12:27:46+5:30
शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते.

मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
मुंबई - महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या भाजपा आणि शिंदेसेनेत जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. १५० जागांवर महायुतीत एकमत झाले असले तरी उर्वरित जागांवरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्यावेळच्या ८४ जागा शिंदेसेनेला हव्या आहेत मात्र भाजपाने शिंदेसेनेच्या या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं समोर येत आहे. पहिल्या बैठकीत भाजपाने शिंदेसेनेला ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र शिंदेसेनेला अजून जागा हव्या आहेत.
शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. त्यामुळे शिंदेसेनेला जास्तीत ६० ते ६५ जागा सोडण्याची तयारी भाजपाची आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या ८४ जागा मुंबई महापालिकेत निवडून आल्या होत्या. परंतु शिवसेनेत २ गट पडले आणि नगरसेवकही फुटले. सध्याच्या घडीला ४७ माजी नगरसेवक शिंदेसेनेकडे आहेत. त्याशिवाय इतर पक्षातील नगरसेवकांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदेसेनेला अधिकच्या जागा वाढवून हव्यात परंतु भाजपाकडून अधिक जागा सोडण्याची तयारी नाही.
एकीकडे जागावाटपावर भाजपाशी बोलणी सुरू असताना दुसरीकडे शिंदेसेनेने मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. रंगशारदा येथे इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रत्येक लोकसभा क्षेत्रासाठी तीन निरीक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतल्या २२७ वॉर्डसाठी २४०० हून अधिक जणांनी मुलाखत दिली आहे. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुलाखती दिल्याची माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.
महायुतीत ७० जागांचा तिढा कायम आहे. भाजपाला मुंबईत १५० हून अधिक जागा लढवायच्या आहेत. मात्र शिंदेसेना कमी जागेत लढण्यासाठी तयार नाही. सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. जर जागा कमी मिळाल्या तर अनेक इच्छुक बंडखोरी करू शकतात अशी भीती शिंदेसेनेला आहे. त्यात १०० हून कमी जागा घेण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवून ताकद आजमावून पाहू असं शिंदेसेनेतील काही नेत्यांना वाटते. त्याशिवाय भाजपाने ७०-८० जागा सोडल्या तर त्यातील २०-२५ जागा अशा आहेत जिथे विजयाची खात्री खूप कमी आहे. या जागांवर समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि इतरांची ताकद असल्याने या जागा निवडून आणणं जोखमीचे ठरेल. मालवणी, नागपाडा, कुर्ला या परिसरातील या जागा आहेत. त्यात नुकतेच भाजपाच्या सर्व्हेमध्ये मुस्लिमांमध्ये एकनाथ शिंदेंना पसंती मिळतेय असं समोर आल्याचे दिसून आले होते. मात्र महायुतीत या जागांवर विजयाची खात्री नाही म्हणून त्या शिंदेसेनेला सोडल्या जातायेत असं शिंदेसेनेला वाटते. त्यामुळे जागावाटपात पेच होऊन ऐनवेळी स्वबळावर लढण्याची वेळ येऊ नये म्हणून दोन्ही पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत.