"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:27 IST2025-07-05T15:26:18+5:302025-07-05T15:27:10+5:30
BJP Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज पार पडला. वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. "आज आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की आमच्या दोघांमधला जो अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला" असं म्हणत निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी असंही म्हटलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 5, 2025
"मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात."
...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
"आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
"उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "भाषेसाठी नाही ही तर.. निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच... निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न!" असं म्हणत निशाणा साधला आहे.