BJP Atul Bhatkhalkar News:राज ठाकरे आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर मते मांडली आहेत. जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले जुने मतभेद, भांडणे विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. पण त्यावर आम्ही काय बोलणार? त्यांनी ऑफर दिली, त्यांनी अटी टाकल्या यावर तेच बोलू शकतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यानंतर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरून खोचक शब्दांत टीका केली.
जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटत आहे
महाराष्ट्र हिताचा यात काही संबंध आहे, ही वस्तुस्थिती नाही. दोघांनाही जनतेने नाकारलेले आहे. त्यामुळेच एकत्र येण्याची गरज त्यांना वाटत असेल. यात महाराष्ट्र हिताचा मुद्दा नाही. महाराष्ट्राचे हित भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे महायुतीचे सरकार उत्तमरितीने जपत आहे. त्यांना वाटत असले, तर त्यांनी करावे. आमचा आक्षेप नाही. ज्यांना आघाड्या करायच्या आहेत, त्यांनी जरूर कराव्यात. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्राचा विकास हा महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतीने होत आहे.
दरम्यान, शिंदेसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात आहेत. त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी ते जाऊ द्या, कामाचे बोला, असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.