Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:23 IST2022-07-12T13:22:26+5:302022-07-12T13:23:21+5:30
Maharashtra Political Crisis: आरे वाचवा आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत”
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आरे वाचवा असे आंदोलनही सुरू करण्यात आले आहे. या आंदोलकांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भेट दिली. मात्र, या आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून भाजपकडून आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यानुसार आरेतील पिकनिक पॉइंट येथे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राइट फोरम’ने केली. ‘सह्याद्री राईट फोरम’चे विधी विभाग प्रमुख दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली होती. याची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत, असा टोला लगावला आहे. तसेच यापूर्वीही याच प्रकरणावरून भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करणे हे त्यांच्या असंवेदशीलता आणि वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक आहे. शिल्लक सेनेकडे कार्यकर्ते उरले नाहीत बहुधा. आदित्य ठाकरे यांचा तीव्र निषेध, अशी टीका केली होती.
दरम्यान, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि इतर संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करूत गुन्हे दाखल करावेत. सबंधित मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांचेही जबाब नोंदवावेत. या सर्व कार्यवाहीचा अहवाल एफआयआरच्या प्रतीसह पुढील तीन दिवसांत सादर करावा, असेही आदेश आयोगाने दिले आहेत. यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.