Join us

आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना पत्र; आता तुमच्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 12:56 IST

कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. कृपया हे लक्षात असू द्या असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जुगलबंदी वाढत चालली आहे. यंदा महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा असा चंग नेत्यांनी बांधला आहे. त्यात मुंबईची जबाबदारी थेट शिवसेनेवर अंगावर घेणाऱ्या आशिष शेलारांसारख्या आक्रमक नेतृत्वाकडे सोपवली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर शेलारांकडून दिले जात आहे. 

सामना अग्रलेखाचा समाचार घेताना मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सामना संपादक उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. शेलारांनी या पत्रात म्हटलंय की, आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेग्विन सेना म्हणायचे का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. कृपया हे लक्षात असू द्या असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

महापालिकेच्या भ्रष्टाचारावर शेलारांचा प्रहार मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम चालवण्याबाबतची निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी अलीकडेच भाजपा नेते आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. या पत्रात म्हटलंय, सदर निविदेचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास येते की, या निविदेमध्ये घालण्यात आलेल्या अटी-शर्ती या एका विशिष्ट  कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व  खोटे असल्याचे दिसून येते आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचे दिसून येते आहे. हे काम तांत्रिक असल्याने  कामांचे तांत्रिक गुणांकन होणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले दिसून येत नाही असं शेलारांनी सांगितले होते.  

 

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेभाजपाशिवसेना