“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 14:18 IST2025-12-23T14:15:20+5:302025-12-23T14:18:19+5:30
BJP Amit Satam News: कुणीही युती केली, एकत्र आले, तरी मुंबई मनपा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी माणूस खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे.

“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
BJP Amit Satam News: उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून मातोश्री आणि शिवतीर्थावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. १९ वर्षानंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ठाकरे बंधूंच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हीच घोषणा आता उद्या १२ वाजता होणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना, कुणीही युती करू शकते. कुणीही एकत्र येऊ शकते. कुणीही वेगळे होऊ शकतात. परंतु, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे नाही. मामूंची टोळी एकत्र आली, त्याने मुंबई मनपा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. ठाकरे गटाचे लोक भाजपात येत आहेत. मामूंच्या नादी लागल्यामुळे महाराष्ट्रभरात यांची जी दारूण अवस्था झाली आहे, त्यामुळे उरले-सुरलेलेही त्यांचा पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. हे लोक भाजपामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करत आहेत, असे भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटले आहे.
मराठी माणूस भाजपा महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे
मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काही परिणाम होणार नाही. पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या रशीत मामूला यांनी पक्षात प्रवेश दिल्यानंतर हिंदुत्वाला मानणारे हिंदुत्ववादी त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. मराठी माणूस हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे. कारण मराठी माणसाला चांगले माहिती आहे की, गेल्या ११ वर्षात मुंबई शहराचा विकास कुणी केला, मुंबईकरांचा विकास कुणी केला, मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने प्राप्त करून दिला. बीडीडी चाळीत १६० फुटांच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला ५६० फुटाचे घर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले. त्यामुळे मराठी माणूस भाजपा महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे, असे अमित साटम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत ज्यांनी २५ वर्षे राज्य केले. त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी केलेले एक काम दाखवावे. आम्ही गेल्या ११ वर्षात केलेली १० कामे दाखवतो. गेल्या २५ वर्षांत मुंबईच्या महापालिकेत बसूनही एकही काम दाखवायला यांच्याकडे नाही. किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगावे, भावनिक मुद्दे सोडून दुसरा कोणता मुद्दा यांच्याकडे नाही. मुंबईकरांना यांचे सत्य कळलेले आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहेत, असे अमित साटम यांनी सांगितले.