मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:34 IST2025-03-23T12:31:26+5:302025-03-23T12:34:01+5:30
मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले.

मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी
MNS Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. तसंच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज सकाळी मुंबईत पार पडलेल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते. पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, पदाधिकाऱ्यांच्या आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे स्वत: याबाबतचा आराखडा तयार करत होते. त्यानुसार आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले.
कोणावर कोणती जबाबदारी?
बाळा नांदगावकर- गट अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
नितीन सरदेसाई- विभाग अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
अमित ठाकरे- शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणे
मुंबई शहराध्यक्ष- संदीप देशपांडे
दरम्यान, मनसेच्या मुंबई शहराध्यक्षांसह तीन उपाध्यक्ष काम करणार आहेत.