Join us  

मोठी बातमी: मविआकडून कोणत्या जागा हव्यात?; प्रकाश आंबेडकरांच्या VBAने पत्र लिहीत केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 6:20 PM

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मविआतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे.

Prakash Ambedkar VBA ( Marathi News ) : चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. मविआच्या नेत्यांकडून आमचा योग्य तो सन्मान ठेवला जात नसल्याची तक्रार वंचितकडून वारंवार केली जात आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना एक पत्र लिहीत जागावाटपाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तसंच मविआच्या आतापर्यंतच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे.

वंचित आघाडीने मविआतील तीन प्रमुख पक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. २ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारीच्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेत आम्हाला वगळले गेले, महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्या आहेत," असा आरोप वंचित आघाडीने केला आहे.

कोणत्या जागा हव्या आहेत?

जागावाटपाबाबत आपल्या अपेक्षा सांगताना वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे की, "वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजप मध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. या पार्श्वभूमी वर महाविकास आघाडीने फक्त स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडी कडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे," असं रेखा ठाकूर यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

वंचित आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं....

उद्धव बाळासाहेब ठाकरे, श्री. शरदचंद्र पवार आणि श्री. बाळासाहेब थोरात

सस्नेह जयभीम,

६ मार्च, २००२४ रोजी फोर सिझन्स, वरळी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात हे अतिशय महत्त्वाचे पत्र मी आपणा तिघांना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने लिहीत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीस बाळासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ मोकळे, राज्य उपाध्यक्ष हजर होते.

राज्य कार्यकारिणीला मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येत आहे की, महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा १० जागांवर आणि तीनही पक्षात ५ जागांवर अशा एकूण ४८ पैकी १५ जागांवर निर्णय होत नाही (tie आहे) अशी परिस्थिती आहे. भाजप-आरएसएसच्या नीच विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. २ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी च्या बैठकांनंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेत आम्हाला वगळले गेले, महाविकास आघाडीची ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब मराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्या आहेत.

हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणी बरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे आणि त्यांना या मतदारसंघात जनाधार कमी आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी ही बाब अडचणीची व त्रासदायक आहे. तसेच हे अधोरेखित केले पाहिजे की मागील २-३ निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणीही या जागा जिंकलेल्या नाहीत, जाणीवपूर्वक 'हरणाऱ्या' जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मत झाले आहे. 'आपली लक्षणीय मते हवीत पण जिंकू शकणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या नाहीत' हेच मविआचे धोरण आहे हा ग्रह कार्यकर्तांचा होत आहे.

वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजप मध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने फक्त स्वतःच्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे.

'वंचित बहुजन आघाडी हा आदर देण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का?' हा प्रश्न मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा तिघांसमोर मांडत आहे. आम्ही महाविकास आघाडीचा आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत परंतू वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नको अशी ही भूमिका आहे. आपण ठरवून आपापसात चर्चा करावी व ९ फेब्रुवारीच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी. आपण बदलाल ही अशा आहे. आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीमहाविकास आघाडीलोकसभा निवडणूक २०२४