Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : मोठी बातमी! पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 15:59 IST

Sanjay Raut Detains by ED : साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

मुंबई :  पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १०अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु झाली. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू  वाढू लागला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले होते. त्यानंतर साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

 

ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी ३-३.३० वाजताच्या सुमारास सुरु झाली. त्यानंतर वाजता संजय राऊत यांना आता ३.५० च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. आता ईडीचे अधिकारी बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात घेऊन जाणार आहेत.  पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी सात वाजताच ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) ८-१० अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील बंगल्यावर छापेमारी केली. यावेळी घरी संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि बंधू सुनील राऊत घरी  होते. या तिघांचीही सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीदेखील सहभागी होती. मात्र, त्यानंतर कंपनी त्या व्यवहारातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता.

सध्या ईडीच्या अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे त्यांनी आपले कुटुंबीय आणि नीकटवर्तीयांच्या खात्यात वळविले होते. यातील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही नावे वळविण्यात आल्याचे प्रवीण राऊत यांच्या चौकशीदरम्यान बोलले गेले. तसेच, याच पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावे दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे ८ भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ईडीने राऊत यांच्यावर ठेवला असून त्या अनुषंगाने ईडीने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती आणि वर्षा राऊत यांच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच किहीममधील ८ भूखंड अशी ११ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केलेली आहे. या प्रकरणी राऊत यांना पुन्हा जुलै महिन्यात दोन वेळा चौकशीसाठी ईडीने समन्स जारी केले होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आता रविवारी ईडीने ही छापेमारी करत संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयपोलिस