Join us

मोठी घडामोड; भाजपा नेत्या मनेका गांधी जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:34 IST

Maneka Gandhi Meet Jitendra Awhad: भाजपाचे नेते खासदार Varun Gandhi हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच वरुण गांधींच्या मातोश्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.

मुंबई - भाजपाचे नेते खासदार वरुण गांधी हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच वरुण गांधींच्या मातोश्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. मनेका गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मनेका गांधी ह्या जितेंद्र आव्हाड यांच्या मुंबईतील बंगल्यावर भेटीसाठी आल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा सुरू होती. एकीकडे वरुण गांधी हे भाजपा सोडणार असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोतलाना मनेका गांधी यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये मला समजले की, जितेंद्र आव्हाड हे म्हाडाकडून रुग्णालयांसाठी जमीन देण्यासाठी तयार आहेत. असा विचार आजपर्यंत कुणी केला नव्हता. ही बाब जेव्हा मला समजली तेव्हा मी त्यांच्याशी बोलले होते. तसेच ते जर या विषयावर गंभीर असतील तर मी मुंबईत येईन. त्यानुसार मी आज इथे आले आहे. यावेळी प्राण्यांना वाचवण्याची लढाई मुंबईतून सुरू होणार का असे विचारले असता मनेका गांधी म्हणाल्या की, ही प्राण्यांना वाचवण्याची लढाई नाही, तर हा एक प्रयत्न आहे ज्यामध्ये प्राणी आणि माणूस आनंदाने एकत्र राहील, असेही त्यांनी सांगितले.

एकेकाळी भाजपाचे फायरब्रँड नेते असलेले वरुण गांधी हे पक्षामध्ये काहीसे बाजूला पडले आहेत. तसेच गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका करत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :मनेका गांधीजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा